पुत्रकामेष्टी यज्ञ आणि विभांडक ऋषी   

भावार्थ रामायणातील कथा, विलास सूर्यकांत अत्रे

अयोध्या नगरी सुख समृद्धीने बहरास आली होती, घरोघरी यज्ञ, याग सुरू झाले होते. हरिकीर्तन, हरिभजन वेदाध्यायन सुरू झाले होते. प्रजा आनंदीत होती. दशरथाला पुत्र प्राप्ती होईल असा वर दिला होता. त्यासाठी दशरथाला यज्ञ करावा लागणार होता, तोही विभांडक ऋषींकडून. विभांडक  ऋषी कायमचे वनात रहाणारे ऋषी होते. अयोध्येत त्यांनी येऊन यज्ञ करणे ही दूरची गोष्ट होती, त्यांची भेट होणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावरही नारदमुनींनी मार्ग सांगितला होता.
 
विभांंडक ऋषींना मृगीपासून एक मुलगा झाला होता. त्या मुलाचे नाव ऋष्यशृंग होते. आपल्या एकुलत्या एक मुलाला विभांडक ऋषींनी खूप जपले होते. विभांडक ऋषींनी त्याला विद्या दिलेली होती. वडिलांसह वनात राहणार्‍या ऋष्यशृंगाचा, नगरवासियांसी कधीच संबंध आलेला नव्हता. वनात राहणार्‍या तप करणार्‍या तापसी लोकांशिवाय ऋष्यशृंगाची इतर कुणाशी  ओळखही नव्हती. त्यामुळे विभांडक ऋषींना न कळता, ऋष्यशृंगाला स्त्री मोहात पाडून अयोध्येस आणून, त्याचा विवाह लावून दिल्यास, विभांडक  ऋषी पुत्रप्रेमाने अयोध्येस येतील आणि कार्यसिद्धी होईल याची नारदमुनींनी दशरथाला खात्री दिलेली होती. ऋष्यशृंगाला स्त्री मोहात पाडण्यासाठी अप्सरांना पाठविण्याचे इंद्राने कबूल केले होते. दशरथाला कबूल केल्याप्रमाणे त्याच वेळी अप्सरांचे आगमन झाले. ऋष्यशृंगाला भुलवा आणि अयोध्येस घेऊन या; मात्र विभांंडक ऋषींना त्याचा अजिबात सुगावा लागू देऊ नका, असे दशरथाने त्या अप्सरांना बजावले होते.
 
नित्य नियमाप्रमाणे पहाटे उठून अनुष्ठान करण्यासाठी, विभांंडक ऋषी कुटी सोडून रानात गेले. त्यांना कुटी सोडून बाहेर गेलेले पाहून या अप्सरा विभांडक ऋषींच्या आश्रमाभवती जमल्या. ऋष्यशृंगाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. ऋष्यशृंगाला कळेना हे कोण नवे तापसी इथे आले आहेत. कधी न पाहिले कधी न देखिले असे हे तापसी. त्यांचे रंग रूप आकार पाहून ऋष्यशृंगाला त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागले. त्यांना पाहून ऋष्यशृंग पर्णकुटी सोडून बाहेर आला. डोळ्यांना डोळे भिडले. ऋष्यशृंग हा मृगीसुत असल्याने हरिणीच्या स्वभावाप्रमाणे तो वागू लागला. मनात कुतुहल तर वाटू लागले; पण भीतीही वाटत होती. साशंक मनाने दुरूनच त्यांच्याकडे मागे वळून वळून पहात राहिला, निरखत राहिला. त्यांची जवळीक तर हवीहवीशी वाटत होती; पण धैर्य होत नव्हते. बोलणे काही न होताच सूर्य मावळतीला गेला. विभांडक ऋषी कुटीकडे येण्याची वेळ झाली. विभांडक ऋषींंची चाहूल लागताच त्या अप्सरा अदृश्य झाल्या. त्या गेल्या पण जाताना ऋष्यशृंगाला चटका लावून गेल्या. सारी रात्र ऋष्यशृंगाने तळमळत काढली. त्या परत येतील का नाही. आपण त्यांच्याशी काही बोललोही नाही, साधी चौकशीही केली नाही, याची त्याला हुरहूर लागून राहिली. नवी पहाट झाली, नित्यनियमाप्रमाणे पुन्हा अनुष्ठानासाठी विभांडक ऋषी वनात निघून गेले आणि ती संधी साधून अप्सरा परत प्रगट झाल्या. ऋष्यशृंगाची भीड चेपली. त्याला अप्सरांचे आकर्षण वाटू लागले. ऋष्यशृंग आणि त्या अप्सरा यांच्यात गप्पागोष्टी सुरू झाल्या.
 
असे म्हणतात की, हरीण हे गोड आवाजाला भुलते. पारधी मंजुळ नाद करतो आणि हरीण त्याच्या पाशात सापडते. ऋष्यशृंग हरिणीचाच मुलगा असल्याने अप्सरांच्या गोड बोलण्याला भुलला. त्यांचे बोलणे, त्यांचा स्पर्श, त्यांचे नेत्रकटाक्ष, याने तो मोहरून गेला. त्या अप्सरांनी ऋष्यशृंगाला जवळ घेतले. त्याची शिकार अप्सरांनी साधली. तो कुटी विसरला, स्नानसंध्या विसरला, स्वत:ला विसरला. वेदाध्यायन, शास्त्रपठण अगदी आपले घरदार, पिता सारे-सारे विसरून गेला. त्या अप्सरांनी ऋष्यशृंगाला अयोध्येला आणले होते. ऋष्यशृंगाला पाहून दशरथाला अपरंपार आनंद झाला. त्याने अवघे नगर शृंगारले, पौरजनांनी गुढ्या तोरणे उभारली. दारोदारी तोरणे माळा लावल्या. दशरथाने ऋषीमुनींना पाचारण केले. दशरथाने त्याचा मित्र शांतन म्हणजेच लोपमुद्रा यास बोलावले आणि वसिष्ठ ऋषींना सांगून ऋष्यशृंग आणि शांतना (शांता) यांचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिले.
 
विभांडक ऋषी संध्याकाळी आपल्या कुटीवर परतले. आल्यावर पाहतात तो काय, आपला लाडका मुलगा ऋष्यशृंग कुटीत नव्हता. विभांडक  ऋषींनी त्याला हाका मारल्या, आजूबाजूला शोधले. ऋष्यशृंग कुठेच दिसेना. काहीतरी गडबड झाल्याचे विभांडक ऋषींना जाणवले. त्यांनी चौकशी केली आणि त्यांना समजले, आपल्या मुलाला दशरथानेच फसवून नेले आहे. विभांडक ऋषींना राग आला. रागाच्या भरात मुलाचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडले. बाहेर पडले आणि तडक ते अयोध्येत आले. अयोध्येत त्यांनी पाहिले संपूर्ण नगर शृंगारले होते, गुढ्या तोरणे उभारलेली. दारोदारी तोरणे माळा लावलेल्या. त्यांना कळेना हा काय प्रकार आहे, कशासाठी ही नगरी सुशोभीत केली आहे? त्यांनी चौकशी केली. बोलता बोलता त्यांना समजले की, दशरथाने त्याची कन्या शांता आणि ऋष्यशृंग यांचे लग्न लावून दिलेले आहे, त्या विवाहासाठी ही नगरी शृंगारली आहे. विभांडक ऋषींना हेही समजले की, दशरथाने आपल्यालाही निमंत्रण दिले होते; पण आपला एका जागी ठावठिकाणा नसल्यामुळे आपल्याला ते निमंत्रण मिळालेले नाही. विभांडक  ऋषींचा राग मुलाचे कौतुक पाहून आणि ऐकून शांत झाला. दशरथाला विभांडक ऋषी आल्याचे समजताच तो विभांडकांना सामोरा गेला, त्यांना नमस्कार केला. त्याचे उत्साहाने स्वागत केले. विभांंडक प्रसन्न झाले आणि दशरथाला म्हणाला ‘राजा तुझे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन‘. त्याचवेळी शांतनु म्हणजेच लोमपद याच्या राज्यात अवर्षण पडल्याने आधी तिथे जाऊन विभांंडकांनी यज्ञ करावा म्हणून लोमपदाने त्यांना विनंती केली. ती दशरथाने तसेच विभांडक ऋषी यांनी दोघांनी मान्य केली. विभांंडकांनी लोमपदाच्या राज्यात जाऊन तिथे यज्ञ केला. अवर्षण नष्ट केले आणि ते पुन्हा अयोध्येत दशरथासाठी आले.वसिष्ठ, विभांडक आणि ऋष्यशृंग यांनी दशरथाला पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला. ऋष्यशृंगाच्या अनुष्टानामुळे यज्ञात यज्ञपुरूष प्रगट झाला आणि त्याने ऋष्यशृंगाच्या हाती पायस दिले आणि लगेचच दशरथाच्या राण्यांना हे पायस वाटून दे अन्यथा विघ्न येईल, असे सांगून यज्ञपुरूष अंतर्धान पावला.

Related Articles